रामायणी फाग  
३०. सीता जन्म
       सीतेच्या जन्माची कहाणी सांगतांना कवी म्हणतो-
        साता समुद्रापलिकडे ब्रम्ह्याने होम मांडीला होता. रकेसुराचे रक्त धरणीवर पडू नये म्हणून ते कमंडलू मधे धरले व कुसळाचे झाकण लावून ते कमंडलू चंदनाची पेटी बनवून त्यात ठेवून ती पेटी समुद्रामधे सोडली. कोळी समुद्रामधे पाग घेवून पागत असतांना त्याच्या पागात ती पेटी सांपडली. ती पेटी त्याने खांद्यावर घेवून ताबडतोब जनक राजाला नेवून दिली. त्या पेटी मधे काय आहे हे पाहण्यासाठी जनक राजाने कुतुहलाने ती पेटी उघडून पाहिली तर त्याला आंत एक सुंदर बालिका दिसली. जनक राजालाही मुल्-बाळ नव्हते. त्याने त्या बालिकेला प्रेमाने मांडीवर घेतली व ह्या कन्येचा विवाह कोणाबरोबर बरे करावा ? दशरथ राजाचा मुलगा राम हाच हिच्यासाठी वर ठिक आहे असा तो विचार करू लागला.
 
साता समुंदराचे तीरी ब्रम्ह्याने होम मांडीला जरी हो ऽऽऽ
होम मांडीला जरी ब्रम्ह्याने होम मांडीला जरी ऽऽऽ
तान्या रकेसुरा ऽ तान्या रकेसुरा ऽ रकेसुराचे रक्त ऽ हो तान्या रकेसुरा ऽ
रकेसुराचे रक्त पाडू नये बा धरणीवर ऽऽऽ तान्या रकेसुराचे रक्त पाडू नये बा धरणीवर ऽऽऽ रक्त धरीयाले ऽ रक्त धरीयाले ऽ धरीयाले कौंडळी ऽ हो रक्त धरीयाले ऽ
धरीयाले कौंडळी झाकणा करी बा कुसळ ऽऽऽ
रक्त धरीयाले कौंडळी झाकणा करी बा कुसळ ऽऽऽ
घडवून चंदनाची ऽ घडवून चंदनाची ऽ चंदनाची पेटी ऽ हो घडवून चंदनाची ऽ
चंदनाची पेटी त्यामधे कौंडळ सोडले ऽऽऽ घडवून चंदनाची पेटी त्यामधे कौंडळ सोडले ऽऽऽ पेटी घेवूनी हो ऽ पेटी घेवूनी गा ऽ घेवूनी खांध्यावरी ऽ हो पेटी घेवूनी गा ऽ
घेवूनी खांध्यावरी समुद्रातीरी हो सोडीली ऽऽऽ
पेटी घेवूनी खांध्यावरी समुद्रातीरी हो सोडीली ऽऽऽ
डिंवर पागीतसे ऽ डिंवर पागीतसे ऽ पागीतसे दालडी ऽ हो डिंवर पागीतसे ऽ
पागीतसे दालडी पागा पेटी सांपडली ऽऽऽ डिंवर पागीतसे दालडी पागा पेटी सांपडली ऽऽऽ
पेटी घेवूनी हो ऽ पेटी घेवूनी गा ऽ घेवूनीया झडकरी ऽ हो पेटी घेवूनी गा ऽ
घेवूनीया झडकरी जनक राजा भेटविली ऽऽऽ पेटी घेवूनीया झडकरी जनक राजा भेटविली ऽऽऽ जनक पेटी हो ऽ जनक पेटी गा ऽ पेटी उघडून पाहे ऽ हो जनक पेटी गा ऽ
पेटी उघडून पाहे कन्या रत्न दिसते आहे ऽऽऽ
जनक पेटी उघडून पाहे कन्या रत्न दिसते आहे ऽऽऽ
कन्या घेवूनी हो ऽ कन्या घेवूनी गा ऽ घेवूनी मांडीवरी ऽ हो कन्या घेवूनी गा ऽ
घेवूनी मांडीवरी जनक मनी हो विचार करी ऽऽऽ
कन्या घेवूनी मांडीवरी जनक मनी हो विचार करी ऽऽऽ
कन्या ध्यावी हो ऽ कन्या ध्यावी गा ऽ ध्यावी कोणत्या वरा ऽ
हो कन्या ध्यावी गा ऽ ध्यावी कोणत्या वरा दशरथ राजाच्या कुंवरा ऽऽऽ
कन्या ध्यावी कोणत्या वरा दशरथ राजाच्या कुंवरा ऽऽऽ
हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥

 
३१. श्री परशुराम अवतार
        सहाव्या अवतारी एकदा परशुराम शिकारीला गेले होते. ते फिरत फिरत जनक राजाच्या नगरीत पोहचले. परशुरामाला पाहताच जनकराजा उठून उभा राहिला. व परशुरामाच्या पायावर आपले मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. जनकाने परशुरामाला जेवणाचा आग्रह केला. धणुष्य खुंटीवर ठेवून ते दोघे जेवणासाठी आंत गेले. त्या वेळी सात वर्षांची जानकी बागेमधे खेळत होती. तिने खुंटीला धणुष्य पाहिले. व ते हातात काढून घेवून ती त्याच्या बरोबर खेळू लागली. परशुराम जेवून बाहेर येताच जानकीने परशुरांमाला पाहिले. व धणुष्य फेकून देउन पळ काढला. हा सारा प्रकार पाहून परशुराम अचंबित झाले व विचार करू लागले. हे साधे सुधे धणुष्य नसून शिवधणुष्य आहे. ते जानकीने उचललेच कसे ? जानकी नक्की कोण आहे ? हे परशुराम समजून गेले व ते जनकाला म्हणाले " आता माझा अवतार संपलेला आहे. हे शिव धणुष्य जो वीर उचलिल त्यालाच सीता वरेल. असा आशीर्वाद देउन ते तेथून निघून गेले.
 
आणिहो सहावे अवतारी हो ऽ सहावे अवतारी परशुराम गेले होते शिकारीला ऽऽऽ
गेले होते शिकारीला परशुराम गेले होते शिकारीला ऽऽऽ
आणिहो हिंडोनी फिरोनी हो ऽ हिंडोनी फिरोनी आले जनकाच्या नगरी ऽऽऽ
जनकाच्या नगरी आले जनकाच्या नगरी ऽऽऽ
जनक सभेतुनी ऽ जनक सभेतुनी ऽ सभेतुनी उठला ऽ हो जनक सभेतुनी ऽ
सभेतुनी उठला देवाच्या चरणी लागला ऽऽऽ
जनक सभेतुनी उठला देवाच्या चरणी लागला ऽऽऽ
जनक बोले हो ऽ जनक बोले गा ऽ बोले बा परशुरामा ऽ हो जनक बोले गा ऽ
बोले बा परशुरामा देवा भोजनासी यावे ऽऽऽ जनक बोले बा परशुरामा देवा भोजनासी यावे ऽऽऽ धणुष्य ठेवून हो ऽ धणुष्य ठेवून गा ऽ ठेवून खुंटीवरी ऽ हो धणुष्य ठेवून गा ऽ
ठेवून खुंटीवरी दोघे भोजनासी बैसले ऽऽऽ धणुष्य ठेवून दोघे भोजनासी बैसले ऽऽऽ
सात वर्षांची ऽ सात वर्षांची ऽ वर्षांची जानकी ऽ हो सात वर्षांची ऽ
वर्षांची जानकी खेळत होती बागेमधे ऽऽऽ सात वर्षांची जानकी खेळत होती बागेमधे ऽऽऽ धणुष्य घेवूनी हो ऽ धणुष्य घेवूनी गा ऽ घेवूनी हातामधी ऽ हो धणुष्य घेवूनी गा ऽ
घेवूनी हातामधी खेळ खेळे नानापरी ऽऽऽ धणुष्य घेवूनी हातामधी खेळ खेळे नानापरी ऽऽऽ परशुराम जेवोनी ऽ हो परशुराम खावोनी ऽ जेवोनी खावोनी ऽ हो परशुराम जेवोनी ऽ
जेवोनी खावोनी देव आले बाहेर ऽऽऽ परशुराम जेवोनी खावोनी देव आले बाहेर ऽऽऽ
सीतेने पाहिले हो ऽ सीतेने पाहिले गा ऽ पाहिले परशुरामा ऽ हो सीतेने पाहिले गा ऽ
पाहिले परशुरामा धणुष्य दिले राव फेकोनी ऽऽऽ
सीतेने पाहिले परशुरामा धणुष्य दिले राव फेकोनी ऽऽऽ
परशुराम बोले हो ऽ परशुराम बोले गा ऽ बोले बा जनका ऽ हो परशुराम बोले गा ऽ
बोले बा जनका माझा अवतार संपला आतां ऽऽऽ
परशुराम बोले बा जनका माझा अवतार संपला आतां ऽऽऽ
जो वीर उचलिल हो ऽ जो वीर उचलिल गा ऽ उचलिल हे धणुष्य ऽ हो जो वीर उचलिल गा ऽ उचलिल हे धणुष्य त्यासी सीता वरील ऽऽऽ
जो वीर उचलिल हे धणुष्य त्यासी सीता वरील ऽऽऽ
ऐसे बोलोनी हो ऽ ऐसे बोलोनी गा ऽ बोलोनीया वचन ऽ हो ऐसे बोलोनी गा ऽ
बोलोनीया वचन देव निघाले तेथून ऽऽऽ ऐसे बोलोनीया वचन देव निघाले तेथून ऽऽऽ
हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥