रामायणी फाग  
विभाग दुसरा
रा मा य ण
पहिल्या भागात आपण विविध देवतांवर आधारीत व इत्तर फाग पाहिलेत. आतां आपण रामायण कथेवर आधारीत फाग पाहू.
२८. अहिल्या शाप
       मी गणपतीला वंदन करून कथा सांगतो ती अशी- एकदा नारद इंद्राच्या दरबारात गेले. त्यावेळी दरबारातील अप्सरांनी त्याचे नाचत नाचत स्वागत केले. दरबारात पोहोचल्यावर ब्रम्हपूत्र नारदाला पाहून इंद्राने नमस्कार केला. व आपल्या सिंहासनावर अर्धी जागा त्यास बसावयास दिली. कळीचाच नारद तो ! त्याने बसल्या बसल्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या दिसायला फारच सुंदर व देखणी आहे. असे इंद्राला सागितले. इंद्राने ताबडतोब कांहिही विचार न करतां आपला रथ सजवायला सांगितला. रथामधे इंद्र व दोन्ही बाजूला ब्राम्हण बसले. अहिल्ये नगराला रथ गेल्यावर इंद्राने गौतम ऋषींचे रूप धारण करूण तो अहिल्येच्या आश्रमी गेला. व कवाडी ( दरवाजा ) उघड असा आवाज दिला. पतिव्रता अहिल्या ताबडतोब बाहेर आली व गौतम ऋषीरूपी इंद्राला मंचकावर नेवून बसविले. इंद्राने भोगाची ईछा प्रगट केली. अशा रीतीने रात्रभर तिचा उपभोग घेवून इंद्र पहाटे जायला निघाला. त्याच वेळी गौतम ऋषी वनातून परत आले त्यांनी दुष्ट इंद्राचे कपट ओळखिले. व त्यांनी तुझी सर्व काया भगेंद्र रोगाने ग्रस्त होइल असा शाप दिला. तर आपली पत्नी अहिल्याहिस तूं शीळा होउन पडशील असा शाप दिला. त्यावर अहिल्या गया वया करून उपशाप मागू लागली. तेंव्हां बारा वर्षा नंतर राम जन्माला येइल व त्याचे या शीळेला लागल्यावरच तुझा उध्दार होइल असा त्याने उ:शाप दिला.
 
माझे नमन आदिया गणां ऽ नारद गेले इंद्र भवना हो ऽऽऽ
गेले इंद्र भवना ऽ नारद गेले इंद्र भवना ऽऽऽ
नारद गेले हो ऽ नारद गेले गा ऽ गेले इंद्र भवना ऽ हो नारद गेले गा ऽ
गेले इंद्र भवना संगे नाचती गोपिंगणां ऽऽऽ नारद गेले इंद्र भवना संगे नाचती गोपिंगणां ऽऽऽ देखूनी ब्रम्ह्याच्या ऽ देखूनी ब्रम्ह्याच्या ऽ ब्रम्ह्याच्या नंदना ऽ हो देखूनी ब्रम्ह्याच्या ऽ
ब्रम्ह्याच्या नंदना इंद्र नमस्कार करी ऽऽऽ देखूनी ब्रम्ह्याच्या नंदना इंद्र नमस्कार करी ऽऽऽ अर्धे सिंहासन हो ऽ अर्धे सिंहासन गा ऽ सिंहासन राखूनी ऽ हो अर्धे सिंहासन गा ऽ
सिंहासन राखूनी नारद बैसकार केला ऽऽऽ अर्धे सिंहासन राखूनी नारद बैसकार केला ऽऽऽ नारद बोले हो ऽ नारद बोले गा ऽ बोले इंद्र राया ऽ हो नारद बोले गा ऽ
बोले इंद्र राया उत्तम गौतमाची भार्या ऽऽऽ नारद बोले इंद्र राया उत्तम गौतमाची भार्या ऽऽऽ
इंद्र रथ हो ऽ इंद्र रथ गा ऽ रथ शृंगारीला ऽ हो इंद्र रथ गा ऽ
रथ शृंगारीला जाउदे अहिल्ये नगराला ऽऽऽ इंद्र रथ शृंगारीला जाउदे अहिल्ये नगराला ऽऽऽ
रूप घेउनी हो ऽ रूप घेउनी गा ऽ घेउनी गौतम ऋषींचे ऽ हो रूप घेउनी गा ऽ
घेउनी गौतम ऋषींचे इंद्र निघाले तेथून ऽऽऽ रूप घेउनी गौतम ऋषींचे इंद्र निघाले तेथून ऽऽऽ रथी चढले हो ऽ रथी चढले गा ऽ चढ्ले नारायण ऽ हो रथी चढले गा ऽ
चढ्ले नारायण दुरंगी बैसले ब्राम्हण ऽऽऽ
रथी चढ्ले नारायण दुरंगी बैसले ब्राम्हण ऽऽऽ
रथ गेला हो ऽ रथ गेला गा ऽ गेला अहिल्ये नगराला ऽ हो रथ गेला गा ऽ
गेला अहिल्ये नगराला तेथे रथ हो उतरीला ऽऽऽ रथ
गेला अहिल्ये नगराला तेथे रथ हो उतरीला ऽऽऽ
कवाडी उघडी गे ऽ कवाडी उघडी गा ऽ उघडी गे सुंदरी ऽ हो कवाडी उघडी गा ऽ
उघडी गे सुंदरी असा तो इंद्र बोलला ऽऽऽ कवाडी उघडी गे सुंदरी असा तो इंद्र बोलला ऽऽऽ
अहिल्या सत्त्वाची ऽ अहिल्या सत्त्वाची ऽ सतवाची सुंदरा ऽ
हो अहिल्या सत्त्वाची ऽ सतवाची सुंदरा कवाडी उघडून आली बाहेर ऽऽऽ
अहिल्या सतवाची सुंदरा कवाडी उघडून आली बाहेर ऽऽऽ इंद्रा धरोनी हो ऽ इंद्रा धरोनी गा ऽ
धरोनी दोन्ही करी ऽ हो इंद्रा धरोनी गा ऽ धरोनी दोन्ही करी बैसविले मंचकावरी
ऽऽऽ इंद्रा धरोनी दोन्ही करी बैसविले मंचकावरी ऽऽऽ भोग देइ गे ऽ भोग देइ गा ऽ देइगे सुंदरी ऽ हो भोग देइ गा ऽ देइगे सुंदरी असा तो इंद्र बोलला ऽऽऽ
भोग देइगे सुंदरी असा तो इंद्र बोलला ऽऽऽ
सारी रात तपक्षणा ऽ सारी रात तपक्षणा ऽ तपक्षणा सुंदरा ऽ
हो सारी रात तपक्षणा ऽ तपक्षणा सुंदरा इंद्र निघाला बाहेर ऽऽऽ
सारी रात तपक्षणा सुंदरा इंद्र निघाला बाहेर ऽऽऽ गौतम आले हो ऽ गौतम आले गा ऽ आले वनातून ऽ हो गौतम आले गा ऽ
आले वनातून ओळखिले इंद्राचे कपट ऽऽऽ गौतम आले वनातून ओळखिले इंद्राचे कपट ऽऽऽ
इंद्राला शाप हो ऽ इंद्राला शाप गा ऽ शाप जो काय दिला ऽ हो इंद्राला
शाप गा ऽ शाप जो काय दिला केली भगेंद्राची काया ऽऽऽ
इंद्राला शाप जो काय दिला केली भगेंद्राची काया ऽऽऽ
अहिल्ये शाप हो ऽ अहिल्ये शाप गा ऽ शाप जो काय दिला ऽ
हो अहिल्ये शाप गा ऽ शाप जो काय दिला केली वनाची वनशीळा ऽऽऽ
अहिल्ये शाप जो काय दिला केली वनाची वनशीळा ऽऽऽ
बारा वर्षे हो ऽ बारा वर्षे गा ऽ वर्षे झालियावरी ऽ हो बारा वर्षे गा ऽ
वर्षे झालियावरी तेंव्हां राम जन्मासी येइल ऽऽऽ
बारा वर्षे झालियावरी तेंव्हां राम जन्मासी येइल ऽऽऽ
तयाचे चरण हो ऽ तयाचे चरण गा ऽ चरण लागल्यावरी ऽ हो तयाचे चरण गा ऽ
चरण लागल्यावरी शीळेचा उध्दार होइल ऽऽऽ
तयाचे चरण लागल्यावरी शीळेचा उध्दार होइल ऽऽऽ
हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥

 
२९ . राम जन्म.
       दशरथ राजाने पुत्र प्राप्ती साठी एक होम करविला. त्या होमाचे फलित म्हणून ऋषींनी दशरथाला तीन पिंड दिले. ते पिंड त्याने आपल्या तिन्ही राण्यांना कैकयी, सुमित्रा व कौसल्या यांना वाटले. त्यामुळे प्रथम कौसले पोटी राम जन्मास आला. दशरथ राजाला मुलगा झाल्यामुळे व गादीला वारस मिळाल्यामुळे अयोध्या नगरी आनंदाने न्हाउन निघाली.
 
एक एक समुंदराचे तीरी ऋषींनी होम मांडीला जरी हो ऽऽऽ
होम मांडीला जरी ऽ ऋषींनी होम मांडीला जरी ऽऽऽ
त्या होमाचे हो ऽ त्या होमाचे गा ऽ होमाचे पिंड रचिले ऽ हो त्या होमाचे गा ऽ
होमाचे पिंड रचिले एक पिंड दिला कैकयेला ऽऽऽ
त्या होमाचे पिंड रचिले एक पिंड दिला कैकयेला ऽऽऽ
एक पिंड दिला हो ऽ एक पिंड दिला गा ऽ दिला सुमित्रेला ऽ हो एक पिंड दिला गा ऽ
दिला सुमित्रेला एक पिंड दिला कौसलेला ऽऽऽ
एक पिंड दिला सुमित्रेला एक पिंड दिला कौसलेला ऽऽऽ
त्या पिंडाचा हो ऽ त्या पिंडाचा गा ऽ पिंडाचा राम जन्मला ऽ
हो त्या पिंडाचा गा ऽ पिंडाचा राम जन्मला सुर्यावंशी उजेड पडला ऽऽऽ
त्या पिंडाचा राम जन्मला सुर्यावंशी उजेड पडला ऽऽऽ
सारीपाट बांधले हो ऽ सारीपाट बांधले गा ऽ बांधले अयोध्येला ऽ
हो सारीपाट बांधले गा ऽ बांधले अयोध्येला उजेड पडला पृथ्वीमेसी ऽऽऽ
सारीपाट बांधले अयोध्येला उजेड पडला पृथ्वीमेसी ऽऽऽ
हर हर गाईन पवित्र श्री रामायण ॥ हर हर गाईन रामायण काय जन्मयोगे ॥