महाभारत फाग  
विभाग तिसरा
महाभारत
दुसर्‍या विभागात आपण रामायण कथेवर आधारीत फाग पाहिलेत. आता आपण महाभारत कथेवर आधारीत फाग व कृष्ण लिला पाहू.
४५. श्री कृष्ण जन्म
       यादव कुळामधे वसुदेव-देवकीच्या पोटी श्रीकृष्ण जन्माला आला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. अशा त्या देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या श्रीकृष्णाला माझे वंदन.
 
माझे नमन यादव कुळा ऽ वसुदेव देवकीच्या बाळा हो ऽऽऽ
देवकीच्या बाळा ऽ वसुदेव देवकीच्या बाळा ऽऽऽ
बाळ जन्मला हो ऽ कृष्ण जन्मला गा ऽ
जन्मला देवकी पोटी ऽ हो कृष्ण जन्मला गा ऽ
जन्मला देवकी पोटी आनंद झाला सकळीकांसी ऽऽऽ
कृष्ण जन्मला देवकी पोटी आनंद झाला सकळीकांसी ऽऽऽ
हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥ हर हर तो कान्हा अवतरला गोकुळामधी ॥

 
४६. पाळणा
       श्रीकृष्णा साठी अक्रोडच्या लाकडाचा पाळणा बनविला असून त्यामधे लहानसा कृष्ण बाळ झोपलेला असून यशोदा त्याला झोके देत आहे.
 
राया अक्रोडचा पाळणा ऽ राया अक्रोडचा पाळणा ऽ
निजलारे बालक तान्हा ऽऽ त्यामधे निजलारे बालक तान्हा ऽऽ
झोके घेइ सुजाना हो ऽऽऽऽ ते बाळ झोके घेइ सुजाना ऽऽऽऽ
यशोदा हलविते पाळणा काय जो जो बाळा ॥ यशोदा हलविते पाळणा काय जो जो बाळा ॥

 
४७. कंस वध.
       आता कंसाच्या वधाची कथा ऐका. गोकुळात श्रीकृष्णाने जन्म घेतला आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. कृष्णाला आणखी कोणी भाउ-बहिण नसल्यामुळे तो त्याचे कारण मावशीला विचारतो. त्या वेळी मावशीने ' तुझ्या सात बहिणींना तुझा दुष्ट मामा कंसाने जन्मताच ठार मारल्याचे सांगितले". हे ऐकून श्रीकृष्णाला भयंकर राग आला. व त्याने कंसाचे मरण कशात आहे ? असे मावशीला विचारले. मावशीने त्याला तसे मरण नाही. त्याला नारायणच मारू शकतो. त्याचे मरण खरगामधे असल्याचे सांगितले. त्यावेळी श्रीकृष्णाने मायावी गोसाव्याचे रूप घेवून तो बांगड्या विकण्यासाठी कंसाच्या नगरीत गेला. त्याच्या आवाजाने कंसाची पत्नी कमळाराणी बाहेर आली. कृष्णरूपी गोसाव्याला पाहून ती भाराउन गेली. व तिने चांगल्या बांगड्या भरण्यासाठी आपला हात पुढे केला. त्यावेळी मायावी कृष्णाने चांगल्या बांगडया भरून कमळावतीचे मन जिंकले. पण बांगड्या भरतां भरतां त्याने तिच्या हाताला इजा केली. व यावर औषद मी माझे खरग घरी विसरून आलो आहे. आणि मी भरलेल्या बांगड्याही चांगल्या झालेल्या आहेत तरी त्या बदल्यात तूं मला तुझ्या पतीचे खर्रग दे. म्हणजे तुझा हात्तही बरा होइल. कमळावतीने मागचा पुढचा विचार न करतां आपला पती कंस झोपला होता त्याच्या उषाखाली हात घालून खरग घेतले व कृष्णाला आणून दिले. खर्रग हातात पडताच कृष्णाने आपली खरी ओळख दाखविली. व मी गोसावी नसून मी तुझा सख्खा भाचा आहे. तूं त्या दुष्ट मामाला उठ्व माझ्या बहिणींचा मला बदला घ्यायचा आहे. हे ऐकताच कमळावती राणी घाबरली. व तीने कंसाला घडलेली सारी हकीकत सांगितली. ते ऐकूण कंसाने ताबड्तोब आपला दरबार भरवला व श्रीकृष्णा बरोबर युध्द करायला तयार झाला. त्याने श्रीकृष्णाला मधे घेरून ठार मारा अशी आपल्या सैन्याला आज्ञा केली. परंतु श्रीकृष्ण अवतारी पुरूष असल्यामुळे त्याने आपल्या कडील अस्र फेकले त्याबरॉबर सारे सैन्य ठार झाले व कंस एकटाच राहिला. श्री़कृष्णाने एका फटक्यात कंसाला पाडले. व गुड्घे त्याच्या छातीवर ठेवून बसला. त्यावेळी कंस त्याची गयावया करून तूं मला मारू नकोस. तूं माझा सख्खा भाचा आहेस. मी माझ्या पोटची मुलगी तुला देतो. मला जीवदान दे. पण कृष्ण ऐकला नाही. त्याने कंसाचे शिर धडावेगळे केले. व विजयाची निशाणी म्हणून ते शिर घेवून आपल्या नगरीत आला.