मनोगत  
शिमगा- भारतामधे निरनिराळ्या प्रांतामधे शिमगा खेळ वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या काळात बरेचसे दर्यावर्दी मराठे आरमारात काम करीत असत. त्यांची उत्पत्ती जसजशी वाढत गेली तसतशी त्यांची समुद्राकाठी वस्ती वाढत गेली. आणि अशा प्रकारे संपूर्ण कोकण किणार्‍यावर त्यांच्या वसत्या तयार झाल्या. असे असले तरी सर्वांनाच आरमारात नोकरी होती असे म्हणता येणार नाही. त्यामुळे बरेच जन पावसाळ्यात शेती व ईत्तर वेळी मासेमारी करू लागले असावेत. पेशवाईत आरमार नष्ट झाल्यावर आणि हे सर्व दर्यावर्दी असल्यामुळे मोठया प्रमाणात समुद्रामार्गे दळण- वळणाकडे वळले असावेत. त्याकाळी बहुतेक घरे कुडाच्या भिंतींची व गवताने शाकारलेली असत. त्यावेळी दळण वळणाचे मुख्य साधन गलबते असल्यामुळे त्या गलबतांतून मंगलोरी कौले व ईत्तर अनेक चीज वस्तू कोकणात व मुंबईत येत असत. पुढे गलबतांची संख्याही वाढली आणि ही बहुतेक गलबते ह्या दर्यावर्दी लोकांचीच होती. आणि म्हणूनच या गलबतांवर काम करणारे ते गाबित हि नवी जात उदयास आली असावी. कारण ' गाबताक गोरवा व भटाक तारवा ' ( काय कामाची ? ) हि म्हण त्यावरुनच रूढ झाली असावी.
     त्यावेळी मंगलोरी कौले व ईत्तर चीज वस्तूं बरोबरच हे लोक मंगलोरहून करमणूकीसाठी घुमटे आणित. याचाच अर्थ घुमटांची कला तिथे अवगत होती. आणि धंद्याच्या निमित्त कारवारला जाणे येणे असल्यामुळे त्यांच्याकडील ही कला गाबित लोकांना आवडली असावी. आणि त्यांची पारंपारिक गाणी ऍकूण आपल्यातीलसुध्दा कोणालातरी हे बहिणाबाई चौधरी सारखे आपल्या मायबोलीतील काव्य सुचले असावे. पुढे ह्या काव्याचा उपयोग फाग महिन्यात म्हणजेच फाल्गुन महिण्यात करण्यात येवू लागल्यामुळे फाग महिन्यात गायची गाणी म्हणून त्यांना " फाग " हा शब्द रूढ झाला असावा. फागांचा सरावसुध्दा एक करमणुक म्हणून गलबतांवरच झाला असावा. त्याचा प्रसार सर्व गलबतांवर होउन त्यांनाच पुढे पारंपारीक गीतांचे स्वरूप आले असावे. हि पारंपारिक गीते सर्व कामे आटोपल्यावर आपले श्रम विसरण्यासाठी शिमग्याच्यावेळी ( शिम- श्रम, गा- गाणे ) होळी पासून धुळवडी पर्यंत ५/७ किंवा ९ दिवस गाउन व करमणुक म्हणून मधे मधे सोंगे आणून लोकाची मनोरंजन करण्याची प्रथा रूढ झाली असावी अशा प्रकारे हे फाग सर्व गाबित वस्त्यांमधे पसरले असावेत. आणि ते सर्वांना आवडल्यामुळे त्यांनी त्यांचा स्विकार केला असावा.
       नागेश्वर नांवाच्या थोर महापुरूषाला आणि त्याचा शिष्य भानूदास यांना हे बहिणाबाई चौंधरी सारखे आपल्या मायबोलीतील काव्य सुचले असावे. व गाबित समाजाने हॉळीच्या दिवसांत म्हणजेच फाल्गुन महिन्यात ( फाग महिन्यात ) गायची गाणी म्हणून त्यांचा " फाग " म्हणून स्विकार केला असावा.
      फागांचे बहुतेक तीन भागात रूपांतर होते. पहिल्या भागात देव्-देवतांचे वर्णन- झुलवे वगेरे मोडतात. दुसर्‍या भागात रामायण कथेवर आधारीत फाग आढळतात. तर तिसर्‍या भागात महाभारतातील कृष्ण लिला आढळतात.
        त्यावेळीचे लोक अनपढ असल्यामुळे त्यांनी कुठेही फाग लिहून ठेवलेले नाहित. त्या मुळे मुळ फाग आज उपलब्ध नाहित. निव्वळ वर्षातून एकदा ते शिमग्याच्यावेळी म्हणायचे, तेवढेच कोणी ते श्रुती पध्द्तीने शिकून घ्यायचे. त्यातही वर्षभराच्या कालावधीमुळे व विस्मृतीमुळे कधी कधी या फागातील ओळ त्या फागात तर एखादे कडवे वर खाली सुध्दा होत असे. किंवा प्रत्येक फाग गायकाने आपापल्या सोईनुसार कांही शब्द बदललेत. कालांतराने साक्षर वाढलेत त्यांनी ते फाग लिहून घेण्याचा प्रयत्न केला. पण कांहीना कांही कारणे दाखवून जून्या लोकांनी ते फाग लिहून द्यायला टाळाटाळ केली. परीणामी त्यात अनेक त्रूटींची भर पडत गेली.
        शिमगा म्हटला की भानगडी. त्यामुळे कित्येक ठिकाणचे शिमगे बंद पडलेत. परंतु इत्तर लोक कला किती तरी पुढे गेल्या आहेत. हे पाहून नवीन पिढीनेही यात रस घेउन, आपसातील भानगडींना तिलांजली दिली आहे. म्हणूनच आज परत एकदा गाबित समाजाच्या ह्या पारंपारीक कलेला सुगीचे दिवस आले आहेत. माझे बंधु श्री पुंडलिक विठू बांदकर यांनी अपार कष्ट करून अनेक जणांना भेटून वेळात वेळ काढून आजू बाजूच्या गांवातीलही फाग ऍकून हे फाग संग्रहीत केले आहेत. परंतु फागी काय गातो हे कित्येक वेळेला कांहीच कळत नाही. म्हणून त्यातील बरेचसे जूने शब्द सुधारून नवीन पिढीला समजेल असे हे सुधारीत फाग इंटरनेटद्वारे जगाच्या कानाकोपर्‍यातील आपल्या गाबित बांधवांना ते अर्थासहित कळावेत व आपली ही पारंपारीक कला जगभर पसरावी म्हणूनच हा सारा खटाटोप.
- ज्ञानदेव विठू बांदकर