सर्व साधारण फाग  
४ इंग्रजांचा हल्ला
       विजयदुर्ग किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी दसर्‍याचा शुभ मुहुर्त पाहून किल्ल्यावर चाल केली. आणि तोफ गोळ्यांचा मारा सुरू केला. त्यावेळी प्रत्यूत्तर म्हणून विजयदुर्गच्या किल्लेदाराने रामेश्वराचे नांव घेवून किल्ल्यावरून तोफ गोळा सोडला तो नेमका इंग्रजांच्या जहाजावर पडला व क्षणार्धात जहाजाने पेट घेतला. त्या बरोबर इंग्रज घाबरले व नांगर वरच्यावर कापून पळू लागले किल्लेदाराने इंग्रजांना पकडून ठार मारण्याची आज्ञा केली परंतु तो पर्यंत इंग्रज दूर पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
 
प्रथम दसर्‍याच्या मुहुर्तान इंग्रज आले हो बार्‍यावर हो ऽ आले हो बार्‍यावर
इंग्रज आले हो बार्‍यावर ऽऽऽ
नांगर सोडून हो ऽ नांगर सोडून गा ऽ सोडून हवल्यावर ऽ हो नांगर सोडून गा ऽ
सोडून हवल्यावर मार देतो किल्ल्यावर ऽऽऽ नांगर सोडून हवल्यावर मार देतो किल्ल्यावर ऽऽऽ
स्मरण करोनी हो ऽ स्मरण करोनी गा ऽ करोनी रामेशाचे ऽ हो स्मरण करोनी गा ऽ
करोनी रामेशाचे त्याने गोळा फेकिला ऽऽऽ स्मरण करोनी रामेशाचे त्याने गोळा फेकिला ऽऽऽ
गोळा पडला हो ऽ गोळा पडला गा ऽ पडला तरांड्यावरी ऽ हो गॉळा पडला गा ऽ
पडला तरांड्यावरी तरांडा जळायासी लागला ऽऽऽ गोळा पडला तरांड्यावरी तरांडा जळायासी लागला ऽऽऽ नांगर कापून हो ऽ नांगर कापून गा ऽ कापून वरचेवरी ऽ हो नांगर कापून गा ऽ
कापून वरचेवरी इंग्रज पळायासी लागला ऽऽऽ नांगर कापून वरचेवरी इंग्रज पळायासी लागला ऽऽऽ इंग्रज गेला हो ऽ इंग्रज गेला गा ऽ गेला दुर नगराला ऽ हो इंग्रज गेला गा ऽ
गेला दुर नगराला हिलारा लावून मारावा त्याला ऽऽऽ
इंग्रज गेला नगराला हिलारा लावून मारावा त्याला ऽऽऽ

 
५. चंद्राला शाप
        गणपतीने चंद्राला शाप दिला त्याचे वर्णन कवीने असे केले आहे-
        मी विघ्नेश्वर गौरीच्या पुत्राला गणराजाला नमन करतो. गौरीने मनामधे गणपतीची मनोभावे आराधना करून मातीचा गणपती बनविला. ह्याच गणराजाने प्रगाट होउन ते बाळ सॄष्टीवर गेले. त्याने चांगली वस्त्रे परीधान करून सभेला आला. त्याचे वाहन एक उंदरीचा बाळ ज्याच्या पायात घुंगरू बांधलेले आहेत. अशा त्या उंदरावर बसून तो देवांचा राजा इंद्र याला भेटायला निघाला त्या वाटेवर एक भुजंग होता. उंदराला पाहताच त्याने फुत्कार केला. तेव्हां उंदिर घाबरून दचकला. त्यामुळे गणपतीही पडला. हे पाहून चंद्र्देव खदाखदा हांसू लागला. त्यामुळे गणपतीला खूप राग आला. त्याच्या डोळ्यातून अग्नीज्वाळा निघू लागल्या. त्याने चंद्रदेवाला आजच्या दिवसाला म्हणजेच गणेश चतुर्थीला तुझे तोंड कोणीही पाहणार नाही. असा शाप दिला.
 
माझे नमन विघ्नेश्वरा गणराज गौरीच्या कुंवरा हो ऽऽऽ गौरीच्या कुंवरा गणराज गौरीच्या कुंवरा ऽऽऽ गौरीन गणराज ऽ गौरीन गणराज ऽ गणराज नमिला ऽ हो गौरीन गणराज ऽ
गणराज नमिला मुळी देव मातयेचा केला ऽऽऽगौरीन गणराज ऽ नमिला मुळी देव मातयेचा केला ऽऽऽ तेथून प्रगट हो ऽ तेथून प्रगट गा ऽ प्रगट झालियावरी ऽ हो तेथून प्रगट गा ऽ
प्रगट झालियावरी ते बाळ गेले सॄष्टीवरी ऽऽऽ तेथून प्रगट झालियावरी ते बाळ गेले सॄष्टीवरी ऽऽऽ गणाने शॄंगार हो ऽ गणाने शॄंगार गा ऽ शॄंगार बरवा केला ऽ हो गणाने शॄंगार गा ऽ
शॄंगार बरवा केला सभा मंड्पासी आला ऽऽऽ गणाने शॄंगार बरवा केला सभा मंड्पासी आला ऽऽऽ गणाचा घोडा हो ऽ गणाचा घोडा गा ऽ घोडा उंदरीचा बाळ ऽ हो गणाचा घोडा गा ऽ
घोडा उंदरीचा बाळ पायी घागुर्‍याचा चाळ ऽऽऽ गणाचा घोडा उंदरीचा बाळ पायी घागुर्‍याचा चाळ ऽऽऽ
त्यावर बॅसोनी हो ऽ त्यावर बॅसोनी गा ऽ बॅसोनीया गणराज ऽ हो त्यावर बॅसोनी गा ऽ
बॅसोनीया गणराज चालले इंद्राच्या भेटी ऽऽऽ त्यावर बॅसोनीया गणराज चालले इंद्राच्या भेटी ऽऽऽ वाटे होता हो ऽ वाटे होता गा ऽ होता एक भुजंग ऽ हो वाटे होता गा ऽ
होता एक भुजंग त्याने फुत्कार केला ऽऽऽ वाटे होता एक भुजंग त्याने फुत्कार केला ऽऽऽ
गणाचा घोडा हो ऽ गणाचा घोडा गा ऽ घोडा लचांगला ऽ हो गणाचा घोडा गा ऽ
घोडा लचांगला चंद्र्देव खदाखद हसला ऽऽऽ गणाचा घोडा लचांगला चंद्र्देव खदाखद हसला ऽऽऽ गणाला कोप हो ऽ गणाला कोप गा ऽ कोप बरवा आला ऽ हो गणाला कोप गा ऽ
कोप बरवा आला डोळा निघती अग्नी ज्वाळा ऽऽऽ गणाला कोप बरवा आला डोळा निघती अग्नी ज्वाळा ऽऽऽ
गणाने शाप हो ऽ गणाने शाप गा ऽ शाप बरवा दिला ऽ हो गणाने शाप गा ऽ
शाप बरवा दिला पाहू नये चौथीच्या चांदाला ऽऽऽ गणाने शाप बरवा दिला पाहू नये
चौथीच्या चांदाला ऽऽऽ
हर हर गौरीच्या कुंवरा बा पुजा केली ॥ हर हर गौरीच्या कुंवरा बा पुजा केली ॥

 
६. मोरिया नाम तुझे
गणपतीचे फागात वर्णन करतांना कवीने म्हटले आहे-
हे देवा तुझे नांव मोरिया ( गणपती ) आहे. तूं कॄपेचा सागर आहेस. म्हणूनच तूं माझे माहेर ( सर्वस्व ) आहेस. तुझी सोंड वाकडी असून तुला एकच दात आहे हे मोरिया, ( गणपती देवा ) ज्ञानिवंता हा भवसागर तराया मजला ज्ञान ( बुध्दी ) दे.
 
अहो ऽ मोरिया नाम तुझे ऽ अहो ऽ मोरिया नाम तुझे ऽ
सागर हे माहेर माझे ऽ कॄपा सागर हे माहेर माझे ऽ
सोंड वाकुडी एक दंत हो ऽऽऽऽ गणाची सोंड वाकुडी एक दंत ऽऽऽऽ
मजला गिन्यान दे मोरिया काय ज्ञानिवंता ॥ मजला गिन्यान दे मोरिया काय ज्ञानिवंता ॥