सर्व साधारण फाग  
१ नमन
कोकणामधे प्रत्येक कार्यक्रमाची सुरूवात स्वागतपर गाण्याने केली जाते. जशी नाटकाची सुरूवात नांदी गाउन केली जाते, त्याच प्रमाणे बर्‍याच कार्यक्रमांची सुरूवात नमनाने केली जाते. शिमग्यामधे त्या त्या संदर्भातील देव देवतांची आळवणी करून त्यांच्या स्मरणाने केली जाते. तसेच हे शिमग्यातील नमन.
 
पहिले नमन धरतरे मातेला ऽ पहिले नमन धरतरे मातेला ऽ
नमन माझे आकारा ऽऽ दुसरे नमन माझे आकारा ऽऽ
नमन माझे परमेश्वरा हो ऽऽऽऽ तिसरे नमन माझे परमेश्वरा ऽऽऽऽ
नमन माझे घोळंकरा हो ऽऽऽऽ चवथे नमन माझे घोळंकरा ऽऽऽऽ
नमन हो गणुराया काय घोळंकरा ॥ पांचवे नमन हो गणुराया काय घोळंकरा ॥

 
२ माता चौंडेश्वरी
गिर्ये पंचक्रोशीची ग्रामदेवता म्हणून श्री चौंडेश्वरी देवी प्रसिध्द आहे. देवीचे वर्णन करतांना- तीने सात साड्यांचा शॄंगार केलेला आहे. तिच्या कमरेत बत्तीस मोहरांचा हार असून देवीला चौरंग मुकुट शोभून दिसत आहे. ( देव ) दिवाळीला ह्या देवीचा ऊत्सव ( यात्रा ) असते. त्यावेळी खूप आनंद होतो. असे कवीने म्ह्टले आहे.
 
देवती चौंडेश्वरी माता थोर ऽ देवती चौंडेश्वरी माता थोर ऽ
साड्यांवर शृंगार ऽऽ सातीव साड्यांवर शृंगार ऽऽ
मोहरांचा हार बोंबिवर हो ऽऽऽऽ बत्तीस मोहरांचा हार बोंबिवर ऽऽऽऽ
मुकुट शोभतो मातेसहो ऽऽऽऽ चौरंग मुकुट शोभतो मातेस ऽऽऽऽ
हर हर दिवाळे दिवशी काय आनंद होतो ॥ हर हर दिवाळे दिवशी काय आनंद होतो ॥

 
३  विजयदुर्ग नगरी
विजयदुर्ग किल्ला आणि परिसरातील देवदेवतांचे वर्णन फागामधे केले आहे ते असे-
विजयदुर्ग नगरीचा गाजावाजा सर्व दर्यावर पसरलेला असून अगदी समुद्र किनारी नेस्तावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला असून त्याच्या मुख्य दरवाजावर वेताळाचे ( भुतांचा राजा ) स्थान आहे. किल्ल्यापासून जवळच रामलिंगाचे ( रामेश्वराचे ) मंदिर बांधलेले असून त्याच्या समोरच आंग्र्यांची समाधी बांधलेली आहे. माता चौंडेश्वरी ही माळावर ( गिर्ये गांवी ) असून तीच्या मंदिराच्या समोरच चव्हाटा आहे. येथील चाळे सांभाळण्यासाठी गांगू ब्राम्हण समर्थ आहे. पुरकाचे थोरवे ऍकून देवी चौंडेश्वरी वेशीवर जाउन राहिली आहे.
 
आणि हो विजयदुर्ग नगरी हो ऽऽऽ विजयदुर्ग नगरी की डंका गर्जे चौबंदरी ऽऽऽ
गर्जे चौबंदरी की डंका गर्जे चौबंदरी ऽऽऽ
किल्ला बांधिला सामोरी हो नेस्तावरी ऽऽ किल्ला बांधिला सामोरी हो नेस्तावरी ऽऽ
आणिरे वेताळ हाय वरी किल्ल्याच्या दरीवजाच्यावरी हो ऽऽऽ दरीवजाच्यावरी किल्ल्याच्या दरीवजाच्यावरी ऽऽऽ
आणिहो रामलिंग महाराज हो ऽ रामलिंग महाराज देउळ बांधले खोरीत ऽऽऽ
बांधले खोरीत आंग्रेराव आहे त्याच्या बाजूस ऽऽऽ
माता चौंडेश्वरी ऽ माता चौंडेश्वरी ऽ चौंडेश्वरी माळार ऽ हो माता चौंडेश्वरी ऽ चौंडेश्वरी माळार चव्हाटा ऍकून पुरकाचे ऽ आहे तिच्या समोर ऽऽऽ
चाळा मदत हो ऽ चाळा मदत गा ऽ मदत पाटीवर ऽ हो चाळा मदत गा ऽ
मदत पाटीवर गांगॉ बिरामन सबळ ऽऽऽ चाळा मदत पाटीवर गांगॉ बिरामन सबळ ऽऽऽ ऍकून पुरकाचे ऽ ऍकून पुरकाचे ऽ पुरकाचे थोरवे ऽ हो ऍकून पुरकाचे ऽ
पुरकाचे थोरवे जाउन बसली वेशीवर ऽऽऽ ऍकून पुरकाचे थोरवे जाउन बसली वेशीवर ऽऽऽ